स्पर्धेचे जीवनात मूल्य

गेल्या काही दिवसात वर्तमानपत्रात आले टी.व्ही वर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येताहेत. राजस्थानमध्ये ‘कोटा’ या गावी आय.आय.टी जे.इ.इ परीक्षेच्या तयारीसाठी अनेक खाजगी वर्ग चालवले जातात. या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणामुळे आत्महत्या केल्या. भारतात आज अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षांद्वारे प्रवेश दिला जातो. जागा कमी आणि प्रवेशाछूक विद्यार्थी जास्त. त्यामुळे परीक्षेला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त होते. ही स्पर्धा जीवघेणी होत चालली आहे. जीवनात स्पर्धा असावी का? हा प्रश्न अनेक तत्वज्ञ, विचारवंत विचारताना दिसतात. स्पर्धेपेक्षा सहकार्य महत्वाचे असेही म्हटले जाते. खरे तर स्पर्धा आणि सहकार्य ही दोन्हीही जीवनमूल्ये आहेत. निसर्गात ही दोन्हीही मुल्ये आढळतात. विषुतवृत्तीय अरण्यात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडांमध्ये स्पर्धा होत असते. तेथील झाडे सूर्य प्रकाश मिळवण्यासाठी उंच उंच वाढलेली दिसतात. अर्थात मोठ्या झाडांच्या सावलीत वाढणारी झाडे खुरटलेलीही दिसतात. निसर्गात स्पर्धेला तोलणारे दुसरे मूल्यही दिसते. परस्परावलंबन (Symboisis) मूल्याचा आधार घेत जीवन समृद्ध करणाऱ्या कवकांसारख्या अनेक वनस्पतीही निसर्गात आढळतात. म्हणजेच ‘स्पर्धा’ नैसर्गिक आहे. नैसर्गिक संसाधने कमी आणि माणसाचा हव्यास जास्त यातून स्पर्धा तीव्र आणि नंतर जीवघेणी होत गेलेली दिसते. स्पर्धा निकोप असेल तर ती विकासासाठी उपयुक्त ठरते!

शिक्षक पात्रता परीक्षाची ओळख - Information About Maharashtra TET

भारतीय नागरिकांना घटनेने अनेक मुलभूत अधिकार दिले आहेत. नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी स्वतंत्र पूर्वकाळात चर्चेला प्रस्तावित केलेला शिक्षणाच्या मुलभूत अधिकारांचा कायदा प्रत्यक्षात यायला स्वतंत्रानंतर ६ दशकाचा काळ लागला. केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत २००२ साली दुरुस्ती करुन ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण (इ. १ ली ते ८ वी) त्यांचा मूलभूत अधिकार केला. आज महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनामार्फत सध्या सुमारे १ लाख प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु असून त्यात सुमारे १.८० कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महात्मा फुले , महर्षी कर्वे , कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण समाजाच्या सर्व सामाजिक आणि आर्थिक घटकांपर्यंत पोचवण्याची चळवळ आज सार्वत्रिक झाली आहे . शिक्षणाच्या प्रसारानंतर आज आव्हान आहे ते शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता वाढवणे . शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता वाढवून आज देशाच्या प्रगतीला ; विकासाला आवश्यक असे मनुष्यबळ विकसित करणे हे खरे उद्दिष्ट आहे. यासाठी शाळांमध्ये शिक्षणासाठी आवश्यक अशा दर्जेदार भौतिक सुविधा व तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित , कृतीप्रधान व आनंददायी होत जाईल तसा शिक्षणाचा दर्जा उंचावत जाईल . औपचारिक शालेय शिक्षणात अध्यापक व विद्यार्थी यांच्यातील आंतर्क्रियेवर शिक्षणाची गुणवत्ता निश्चित होते आणि या प्रक्रियेत शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. ‘मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण’ कायद्यात शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीचा विचार केला आहे. “राष्ट्रिय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०१० व दिनां २९ जुलै, २०११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ली ते ८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) TET अनिवार्य केली आहे. कायद्याच्या वरील तरतूदीच्या अनुषंगाने केंद्र शासन तसेच इतर काही राज्यानी “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) घेण्यास सुरुवात केलेली. आज राष्ट्रीय स्तरावर शिक्षक पात्रता परीक्षा CTET या नावाने घेतली जाते तर राज्य स्तरावर प्रत्येक राज्य स्वतंत्रपणे परीक्षा घेते व या परीक्षा MAHATET, UPTET, KTET या नावाने ओळखल्या जातात . शैक्षणिक व व्यावसायिक आर्हते बरोबर आता शिक्षक होण्यासाठी “शिक्षक पात्रता परीक्षा TET ” उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET

इयत्ता पहिली ते पाचवीकरिता (पेपर १ ) व इयत्ता ६ वी ते ८ वी करिता (पेपर २ ) या दोन स्तरावर घेतली जाते. वर्षातून एकदा हि परीक्षा आयोजित केली जाते. “शिक्षक पात्रका परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये कनिष्ठ प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व वरिष्ठ प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील. उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकपासून ७ वर्षे राहील. शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ठ होता येईल.

अभ्यासक्रमाचा स्तर

दोन्ही प्रश्नपत्रिकांचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील.

पात्रता गुण

या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.

प्रश्नपत्रिका आराखडा

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर
एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र ३० ३० बहुपर्यायी
भाषा-१ ३० ३० बहुपर्यायी
भाषा-२ ३० ३० बहुपर्यायी
गणित ३० ३० बहुपर्यायी
परिसर अभ्यास ३० ३० बहुपर्यायी
एकूण १५० १५०

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र ३० ३० बहुपर्यायी
भाषा-१ ३० ३० बहुपर्यायी
भाषा-२ ३० ३० बहुपर्यायी
अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे (Social Studies)
६० ६० बहुपर्यायी
एकूण १५० १५०

पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.
अधिक माहिती व अपडेटेड तपशील महाराष्ट्र शासनाच्या http://mahatet.in व www.mscepune.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
मित्रांनो , महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MaharashtraTeacher Eligibility Test) MAHATET २०१४ हि स्पर्धा परीक्षा असल्याने या विशेष परीक्षेची तयारी करताना अभ्यासाबरोबर मानसिक तयारी करणे व अपेक्षित गुण प्राप्त करण्यासाठी स्पर्धात उतरणे आवश्यक आहे.
पुढील ब्लॉगमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याचा विचार करू.


Maharashtra TET Information

परवाच्या वृत्तपत्रात एका बातमीने लक्ष वेधून घेतले ‘ असममधील कार्बियालोंग ऑटोनॉमास कौन्सिल’ ने राबवलेली शिक्षक भरती प्रक्रिया असम सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने उमेदवार “शिक्षक पात्रता परीक्षा” उत्तीर्ण नसल्याने अवैध ठरवली . अशा आशयाच्या अनेक बातम्या गेल्या काही महिन्यात येत आहेत. शिक्षक पेशा स्विकारायचा असेल तर शैक्षणिक व व्यावसायिक आर्हते बरोबर आता “शिक्षक पात्रता परीक्षा TET ” उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासनाने या परीक्षेची अधिसूचना काढली असून महाटीईटी - २०१४ परीक्षेसाठी ऑनलाइन आवेदनपत्र नोंदणीला दि.०१.१०.२०१४ रोजी पासून सुरूवात झाली आहे. तपशील महाराष्ट्र शासनाच्या http://mahatet.in व www.mscepune.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत . दिनांक १५ डिसेंबर २०१४ रोजी आयोजित केलेल्या या परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरेल या दृष्टीने ब्लॉगवर काही टिप्स देणार आहे . आपला संवाद वाढायला व तुम्हाला परीक्षेची तयारी करायला या संवादाचा नक्की उपयोग होईल . आपल्या प्रतिसादाचा अपेक्षेत .


123